नीरा-देवघर प्रकल्पाला 3976.83 कोटी निधी मान्य

फलटण -नीरा देवघर पाटबंधारे प्रकल्पासाठी राज्य शासनाने 3,976.83 कोटी निधईस प्रशासकीय मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय करून जलसंपदा विभागाने आज अध्यादेश प्रसिद्ध केला असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील देवघर गावाजवळ नीरा नदीवरील देवघर धरण सुरुवातीचे मोठे धरण असून या प्रकल्पाचे लाभक्षेत्र कृष्णा खोऱ्यामध्ये आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशामध्ये आहे. धरणाचा एकूण साठा 12.98 अ. घ. फु इतका आहे. या प्रकल्पाचे दोन कालवे असून उजवा कालवा 158 किलोमीटर लांबीचा व डावा कालवा 18 किलोमीटर लांबीचा आहे. नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्यामुळे भोर तालुक्यातील 6,670 हेक्टर, खंडाळा तालुक्यातील 11,860 हेक्टर, फलटण तालुक्यातील 13,550 हेक्टर व माळशिरस तालुक्यातील 10979 असे एकूण 40050 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच सांगोला व पंढरपुर तालुक्यातील काही भागाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परंतु, यापूर्वीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारने हा प्रकल्प होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजपर्यंत अनेक तालुक्यांतील दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप या सरकारने केले होते. परंतु, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करून नीरा देवघर प्रकल्पाची बंद पडलेली फाईल सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पुढे नेली. या क्षेत्रातील शेतकऱ्यांना कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी हा प्रकल्प होणे खूप गरजेचे आहे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबत त्यांच्या दालनामध्ये सचिव व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यास मंजुरी घेतली.कालच याबाबतचा जीआर राज्य शासनाने काढला आहे. आता लवकरच आता निविदा निघून काम सुरू होणार आहे, असा विश्वास खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला.
त्यामुळे या भागातील कायमस्वरूपी दुष्काळ आता संपणार आहे. खासदार नाईक निंबाळकर यांनी नीरा देवघर प्रकल्पातूनच एकूण पाणी वापरामधून धोम बलकवडी हा प्रकल्प चारमाही होता, तो आता आठमाही केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवून फलटण तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. या भागातील शेती व्यवसाय वाढल्यास अनेक रोजगार उपलब्ध होतील व जे तरुण रोजगारासाठी नोकरी, व्यवसायासाठी मुंबई, पुणे येथे जात आहेत ते आता फलटण तालुक्यामध्येच आधुनिक पद्धतीने व्यवसाय करू लागतील, असे त्यांनी नमूद केले.





