चाळीसगावात 39 किलो अॅम्फेटामाइन जप्त, तब्बल 50 कोटींचा ड्रग्स साठा पकडला

चाळीसगाव: चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा येथे केलेल्या तपासणीदरम्यान एका संशयित वाहनातून तब्बल 39 किलो अॅम्फेटामाइन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या ड्रग्सची बाजारातील किंमत 40 ते 50 कोटी रुपये असण्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी वाहनचालकासह वाहन ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ड्रग्स साठा दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगरमार्गे कर्नाटकातील बेंगलोर येथे नेला जात होता. या प्रकरणात आंतरराज्यीय तस्करीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता आहे. अॅम्फेटामाइन हा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात परदेशातून तस्करीद्वारे आणला जातो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनी या कारवाईनंतर तातडीने महामार्ग पोलीस केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिली असून, सखोल तपासाची विनंती केली आहे. चव्हाण म्हणाले, “अंमली पदार्थांचा पुरवठा वाढवून तरुण पिढीला व्यसनाधीन करणे आणि देशाला कमकुवत करण्याचे षड्यंत्र देशविरोधी शक्ती रचत आहेत. या कारवाईमुळे अशा रॅकेटला आळा बसेल.”
राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तपास युद्धपातळीवर सुरू असून, या रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.
आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘ड्रग्जमुक्त महाराष्ट्र’ संकल्पाला बळ देणारी ही कारवाई असल्याचे सांगितले. तसेच, पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करत त्यांनी पुढील तपासात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली.




