पाकिस्तानातून आलेले 39 कंटेनर जप्त; महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई

नवी मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातील मालाच्या आयातीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट अंतर्गत 1,115 मेट्रिक टन वजनाचा सुमारे 9 कोटी रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. हे 39 कंटेनर्स न्हावा शेवा बंदरावर पकडले गेले आहेत.
या प्रकरणी एका आयातदार कंपनीच्या भागीदारास अटक करण्यात आली आहे.पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट अप्रत्यक्ष मार्गाने येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. यापूर्वी अशा मालावर 200 टक्के सीमा शुल्क आकारण्यात येत होता. मात्र, ही बंदी झुगारून काही आयातदार दुबईमार्गे पाकिस्तानातून माल आणत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याचे मूळ यूएई असे भासवले जात होते. पण त्यांचा हा डाव फसला.
या प्रकरणात डीआरआयच्या तपासात असे स्पष्ट झाले की, पकडलेला माल पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईतील जाबेल अली पोर्टवर नेण्यात आला. तेथून दुसऱ्या जहाजांमधून आणि दुसऱ्या कंटेनर सेटमधून भारतात पाठवण्यात आला. ज्या कंटेनरवर यूएई इथून हा माल आला असल्याचे दाखवले होते. प्रत्यक्षात तो माल पाकिस्तानातून आलेला होता. या व्यवहारांमध्ये पाकिस्तानी आणि यूएई नागरिकांचा समावेश असून, बनावट शिपिंग डॉक्युमेंट्स तयार करून मूळ देश लपवण्याचा प्रयत्न झाला आहे.
या तपासादरम्यान काही महत्त्वाच्या आर्थिक पुराव्यांची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानमधील संस्थांशी आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे अवैध आर्थिक प्रवाह आणि भारताच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.





