काँग्रेसचा अजित पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यासह ३७ जणांचा राष्ट्रवादीला रामराम

नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. अशातच आता नांदेडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ३७ जणांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात अजित पवार यांना हा फार मोठा धक्का मानला जात आहे.
नेमकं काय घडलं आहे?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह मोठा गट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. यामध्ये 4 माजी नगराध्यक्ष, 23 माजी नगरसेवक, 8 नगरसेवक, 2 माजी जिल्हा परिषद सदस्य यासह माजी पंचायत समिती सभापती यांचा समावेश आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा २८ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी थेट काँग्रेसमध्ये जात असल्याने अजित दादांसाठी नांदेडमध्ये हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
या सर्वांच्या पक्षप्रवेशाने नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणारी ही इनकमिंग या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उभारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





