Nagar | संपामुळे एसटीचे ३७ लाखांचे नुकसान

नगर, (प्रतिनिधी) – राज्यातील एस.टी.कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. जिल्ह्यातील ११ आगारांच्या १ हजार ५१६ नियोजित बस फेऱ्यांपैकी ३०९ फेऱ्या झाल्या आहेत. १ हजार २०७ फेऱ्या रद्द झाल्याने अहमदनगर विभागाचे एका दिवसात या संपामुळे ३७ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
शहरातील तारकपूर, माळीवाडा आणि स्वास्तिक या तिन्ही बसस्थानकांवर सकाळपासून प्रवाशी बसची वाट पाहत होते. खासगी वाहतूक करणारे वाहन चालकांनी दुप्पट दर आकारणी सुरू केली होती.
कोकणातील मूळ रहिवासी असलेले आणि मुंबई, ठाणे, पालघर आणि उपनगरात राहणारे कुटुंब हे दरवर्षी गणेशोत्सवासाठी मूळ गावी जातात. एस.टी. महामंडळाने ३ते ७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव यात्रेचे आयोजन केले होते.
या भाविकांसाठी ५ हजार जादा बसची व्यवस्था केली होती. शेजारी जिल्ह्यातून जादा बस मागविण्याचे प्रस्तावित होते. परिणामी इतर आगारातून जादा बस मुंबई मार्गावर सोडल्या जात आहेत.
एस. टी. कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणं वेतन द्यावे, डी. अँड डी. प्रोसिजरमधील जाचक अटी रद्द कराव्यात या प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप करण्याचा इशारा दिला होता.
राज्यातील ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने आंदोलनाचा इशारा राज्य शासनाला दिला होता.
गेल्या महिन्यात एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने वेतनवाढीसह इतर समस्यांबाबत राज्य सरकारशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी संप सुरू केला. राज्य सरकारच्या कर्मचाप्रमाणे वेतन द्यावे, अशी कामगार संयुक्त कृती समितीची प्रमुख मागणी आहे.
जिल्ह्यात एस.टी. महामंडळाचे ११ आगार आहेत. या आगारांमधील बसच्या १ हजार ५१६ फेऱ्या होत असतात. संगमनेर आगाराच्या सर्वच्या सर्व २५७ फेऱ्या झाल्या आहेत. तारकपूरच्या ४७ तर श्रीगोंदे आगाराची एक फेरी झाली आहे. अवघ्या ३०९ फेऱ्या झाल्या आहेत. या फेऱ्या रद्द झाल्याने ३७ लाख ७३ हजार १०४ रूपयांचे नुकसान झाले आहे.

