पुणे | लाडक्या बहिणीमुळे प्रवाशांचे हाल

पुणे, [प्रभात वृत्तसेवा} – आधीच पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या कमी झाल्यामुळे संचलनात तूट आहे. त्यात बालेवाडी येथील लाडकी बहीण कार्यक्रमासाठी ४७५ बस गेल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पीएमपीचे संचलनच बिघडले.
शहरातील महत्वाचे मार्ग आणि बसस्टाॅपवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. बससाठी बराचवेळ वाट पहावी लागत असल्याने प्रवाशी वैतागले.
आयुर्मान संपल्यामुळे मागील सहा महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यातील जवळपास २०० बस कमी झाल्या. त्यामुळे संचलनात १८०० ते १९००च्या आसपास धावणाऱ्या बसची संख्या १७०० पर्यंत खाली आली.
टप्याटप्याने बस कमी होत आहेत. त्यात सण-उत्सव आल्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बसला मोठी गर्दी असून, बसच्या अपुऱ्या संख्येमुळे दररोज शाळा, महाविद्यालय,
कार्पोरेट कार्यालय परिसर आणि मार्गावरील बसस्टाॅपवर प्रवाशांची गर्दी अधिक होत आहे. मात्र, त्या तुलनेत बससेवा तत्काळ उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांना बराचवेळ बसची वाट पहावी लागते.
बालेवाडी येथील एका कार्यक्रमासाठी एकूण ४७५ बस पुरविण्यात आल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत २२० आणि पुणे महापालिका अंतर्गत २५५ बसचा समावेश आहे.
या बस सुरवातीपासून कार्यक्रम संपून पुन्हा प्रवाशांना घरी सोडण्यापर्यंत कार्यक्रमात असल्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन संचलनाचे नियोजन कोलमडले. त्याचा फटका प्रवाशांना अधिक बसला.
संचलनातील जवळपास ५०० बस कमी झाल्यामुळे आहे त्या बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देताना पीएमपी अधिकारी आणि डेपो प्रमुखांची तारेवरची कसरत झाली.
या मार्गावर अधिक गर्दी…
कर्वे रस्ता, शिवाजी रस्ता, पौड रस्ता, शास्त्री रोड, फर्ग्युसन आणि जंगली महाराज रोड, हडपसर, नगर रोड, सिंहगड रोड, सातारा रोडवर बहुतांश बसस्टाॅपवर प्रवाशांची गर्दी होती. बस वेळेत येत नसल्यामुळे प्रवासी वैतागले. त्यामुळे बसस्टाॅपवर असलेल्या तिकिट तपासणी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी वेळ मारून नेता येईल, अशी उत्तरे दिली.
मात्र, त्यामध्ये प्रवाशांचे हाल झाले. त्यात शनिवार सुट्टीचा दिवस, दहीहंडी, गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारापेठांमध्ये येण्यासाठी प्रवाशी बसने यायचे म्हटल्यावर त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.





