Nagar | संगमनेर दूध संघाचे ३७ कोटी रुपये बँकेत वर्ग

संगमनेर, (प्रतिनिधी): संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दूधाचे पेमेंट, अनामत,
कामगारांना बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ – उतार निधी रक्कम, असे एकूण सुमारे रूपये 37 कोटी रक्कम सबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करत असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले की, दूध संघाची वाटचाल कायमच कौतुकास्पद राहिलेली आहे. दूध संघाची मागील वर्षाची उलाढाल 538.10 कोटी रूपये झाली आहे. दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत-जास्त दूध दर फरक अदा करण्यात येतो.
दूध संघाचे गुणवत्तेचे कामकाज व पारदर्शक कारभार यामुळे तालुक्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली असून, दूध उत्पादकांनी सहकारावर सातत्याने विश्वास ठेवलेला आहे.
सालाबादप्रमाणे दिपावली सणानिमित्त दूध उत्पादक व कामगारांना बोनस रक्कम अदा होत असल्यामुळे दूध उत्पादक, कामगार व व्यापारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
संगमनेर तालुक्यात सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी अथक परिश्रम घेऊन सहकारी संस्था स्थापन केल्या.
त्यांचे अथक प्रयत्नामुळे सहकारी संस्थांची प्रगती झाली. दूध उत्पादक सभासदांचे सातत्याने हित जोपासतांना दूध उत्पादकांना फायद्याचे ठरतील, असेच निर्णय घेतले जातात.
संगमनेर दूध संघाचा दिपावलीनिमित्त वरीलप्रमाणे दूध दर फरक अदा करण्याचा निर्णय ऑगष्ट महिन्यात झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सभेत व संचालक मंडळाचे सभेत घेतलेला आहे.
तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांना किफायतशीर दूध भाव मिळणेकामी संगमनेर दूध संघास स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा, असे आवाहन संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर व कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले आहे.



