पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या गेल्या राज्याबाहेर: सुप्रिया सुळेंची सरकारवर जोरदार टीका

मुंबई – राज्यातील विविध प्रस्तावित प्रकल्प परराज्यांत, विशेषत: गुजरातमध्ये जात असल्यावरून विरोधकांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित झाल्याचा दावा काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे की, ‘महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापुर्वीही महत्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही. आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून ३७ कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे. एक उद्योग बाहेर जातो तेंव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भविष्य देखील संकटात येतात. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे.’
राज्यातील प्रस्तावित वेदांत-फॉक्सकॉन, टेक्स्टाईल पार्क, टाटा एअरबस, मेडिसीन डिव्हाइस पार्क, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क, टेक्सटाईल पार्क हे प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून विरोधकांनी रान उठविले होते. त्यापाठोपाठ अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या ‘महानंद’चे हस्तांतरण झाले आहे.
महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आलेला आहे. यावरून काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
तर आठवड्याभरापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत आणखी एक प्रकल्प मध्य प्रदेशात जात असल्याचे म्हटले होते. सरकारी गॅस कंपनी गेल इंडिया ही 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळमध्ये इथेन क्रॅकिंग युनिट उभारणार होते. पण आता हा प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशच्या सीहोर येथे उभारला जाणार आहे. त्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
हिंजवडी आयटी पार्क मधून तब्बल ३७ कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे.
एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं….… pic.twitter.com/kRGZ71EYPB— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 29, 2024





