खडकवासला धरणातून 35310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

पुणे – खडकवासला धरणातून आज शनिवारी रात्री 11 वाजता मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खडकवासला धरणक्षेत्र परिसरात पाऊस सुरु असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणातून मुठा नदी पात्रात आधी 27 हजार 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर रात्री 10 वाजता त्यात वाढ करुन 31 हजार 515 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर आता रात्री 11 वाजता 35 हजार 310 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
आवश्यकतेनुसार यात बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रात अडकल्या गाड्या –
मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच नदी पात्रात वाहनचालकांनी पार्क केलेल्या चारचाकी गाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. काही गाड्या वाहून जाण्याची भीती आहे.
दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट –
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात 24 व 25 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, आठवडाभरापासून पुणे परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे.






