35 वर्षांची की 124? निवडणूक यादीत घोळ, मिंता देवी देशभरात चर्चेत

पाटणा –बिहारमधील मतदार असणारी मिंता देवी ही महिला अचानकपणे देशभरात चर्चेचा विषय बनली. खरे वय ३५ वर्षे असताना प्रारूप मतदार यादीने तिचे वय १२४ वर्षे दर्शवण्याची किमया केली. एवढेच नव्हे तर, मतदार म्हणून तिची पहिल्यांदाच नोंदणी झाली. तिचा संदर्भ देऊन विरोधकांनी दिल्लीत संसद परिसरात निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने मला आजी बनवले, अशी मिश्कील प्रतिक्रिया मिंता देवीने दिली.
बिहारमधील मतदार याद्या पडताळणीवर विरोधकांकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले आहे. अशात मिंता देवीशी संबंधित गफलत समोर आली. त्यामुळे विरोधकांच्या हाती आणखी एक प्रकरण आले. मिंता देवीचा संदर्भ देऊन विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. काही खासदारांनी मिंता देवीचे छायाचित्र छापलेले टी-शर्ट परिधान करून निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला.
साहजिकच, मिंता देवीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे काही पत्रकारांनी तिला गाठले. त्यावेळी तिने प्रारूप मतदार यादीतील घोळासाठी तिला जबाबदार धरले जाऊ नये, अशी भावना व्यक्त केली. मतदार म्हणून अद्याप माझे नाव नोंदले गेले नव्हते. त्यासाठी यावेळी मी बुथस्तरीय अधिकाऱ्याच्या (बीएलओ) भेटीची प्रतीक्षा केली. मात्र, बीएलओ नाव नोंदवण्यासाठी न आल्याने मी ऑनलाईन गणना पत्र भरले. मी १९९० यावर्षी जन्मल्याचे नमूद केले. पण, प्रारूप यादीत ते वर्ष १९०० असे छापून आले, असे तिने म्हटले.
दरम्यान, मिंता देवी संदर्भात सिवान जिल्हा प्रशासनाने एक निवेदन जारी केले. संबंधित प्रकरण बातम्यांचा विषय बनण्याआधीच मिंता देवीशी संपर्क साधण्यात आला. वय चुकल्याचे ध्यानात आल्याने बीएलओने दुरूस्तीसाठीचा अर्ज तिच्याकडून भरून घेतला. पडताळणी प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात ती दुरूस्ती होईल, अशी सारवासारव प्रशासनाने केली.

