पिंपरी : वाढत असलेली लोकसंख्या, वाढते आजार आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे रक्ताची मागणीही वाढली आहे. परंतु, रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती आणि गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेच रक्तदान कमी होत असल्याने रुग्णालयांना रक्ताची टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर रुग्णांच्या नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी फिरावे लागत आहे. काही रक्तपेढ्या रक्त देण्यापूर्वी रक्तदाता आणण्यास सांगतात. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तदाता शोधत फिरावे लागते. वायसीएम रुग्णालयात वर्षभरात १३ हजार जणांनी रक्तदान केले आहे. त्यातून तीन वेगवेगळे घटक तयार करून २१ हजार जणांना पुरवठा केला आहे. तर मागणी ३५ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, कंपन्या यांनी रक्तदार शिबिराचे आयोजन करताना वायसीएम रुग्णालयास प्राधान्य द्यावे, असे आवाहन वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जमा होणारे रक्त आणि मागणी यामध्ये मोठी तफावत आढळून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे रक्तदानाबाबत जनतेत जागरुकता निर्माण झालेली नाही. तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची आठ रुग्णालये असून त्यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. तसेच इतर आजारांवरील उपचारातही रक्ताची आवश्यकता असते. याशिवाय खासगी रुग्णालयातूनही रक्ताची मागणी घेऊन रुग्णांचे नातेवाईक येत असतात. याशिवाय, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगामुळे रक्तपेशीची गरज निर्माण होते. परंतु, रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तपेशी वेळेवर न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. म्हणून रक्त संकलनापेक्षा पुरवठा जादा गेल्या वर्षी १३ हजार जणांनी रक्तदान केले. जमा झालेल्या रक्तातून आवश्यकतेनुसार लाल, पाढर्या व पातळी द्रव असे वर्गीकरण केले. त्यामुळे २१ हजार जणांना पुरवठा करता आला. मात्र मागणी ३५ हजार रुग्णांकडून आहे. रक्तदानाला निवडणुकींचा फटका यंदाच्या वर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या काळात आचारसंहितेमुळे राजकीय नेत्यांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन झाले नाही. यामुळे या कालावधीत रक्तदान कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. खासगी रक्तपेढ्यांकडून आमिष खासगी रक्तपेढ्या अनेक ठिकाणी रक्तदानाची शिबिरे घेतात. या शिबिरांमध्ये सहभागी होणार्यांना भेटवस्तू देतात. मात्र रक्तदात्यांना भेटवस्तू देऊन आमिष दाखविणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच काही रक्तपेढ्यांमध्ये रक्त घेतल्यास त्याच्या बदली रक्त देण्याबाबत सक्ती केली जाते. हा प्रकारही कायद्याने गुन्हा आहे. वायसीएम रुग्णालयात तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये गोरगरीब रूग्ण उपचार घेतात. या रुग्णांचे नातेवाईक पैशांअभावी खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त विकत घेऊ शकत नाहीत. यामुळे सामाजिक संस्था, विविध कंपन्या. सार्वजनिक मंडळे यांनी रक्तदान करताना वायसीएम रुग्णलयास प्राधान्य द्यावे. तसेच रक्तदान शिबिरासाठी ०२०-६७३३२३८८/६७३३२३८९ या क्रमांकावर संपर्क साधावा. – डॉ. निता घाडगे, रक्त संकलन अधिकारी