अलिबाग : यंदाचा गणेशोत्सव पेण तालुक्यातील महिला बचतगटांसाठी आर्थिक प्राप्तीचा ठरला आहे. कारण पेण तालुक्यातील 70 बचतगटांतील महिलांनी तब्बल 35 हजार गणेशमूर्ती बनवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. यातून तब्बल 2 कोटी 89 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. यामुळे महिला बचतगट भविष्यात गणेशमूर्ती व्यवसायाला पुरेपूर गवसणी घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. पेण तालुक्यातील 70 महिला बचतगटातील महिलांनी ‘उमेद अभियान’ अंतर्गत गणपतीमूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे. पहिल्याच पावलात कोट्यवधींची उलाढाल करून या महिलांनी दाखवून दिले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी बचतगटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने गणपतीमूर्ती व्यवसायात नाराशक्तीच्या सामर्थ्यांची झलक सर्वांनी दिसली. ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पेण तालुक्यात जिल्हा परिषद दादर गटामध्ये प्रहार महिला प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. त्यात 17 ग्राम संघांचा समावेश आहे. या ग्रामसंघात 441 महिला बचतगट जोडलेले असून, त्यापैकी 70 बचतगटातील महिला गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या 35 हजार गणेशमूर्तींपैकी दीड हजार मूर्तींना परदेशी भाविकांनी पसंती दिली आहे. महिलांना आर्थिक शक्ती देण्यासाठी उमेद अभियानामार्फत महिला बचतगटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत आर्थिक मदत करण्यात आली. एकूणच महिला बचतगटांची उमेद वाढवल्याने महिला आर्थिक सक्षम व्हायला मदत झाली आहे.