कोलंबियात भूस्खलनामध्ये 34 जणांचा मृत्यू

बोगोटा (कोलंबिया) – कोलंबियामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे झालेल्या प्रचंड भूस्खलनामध्ये किमान 34 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य कोलंबियामध्ये डोंगराचा कडा कोसळून एक प्रवासी बस आणि अन्य दोन वाहने गाडली गेली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. मृतांमध्ये 8 बालकांचाही समावेश असल्याचे “नॅशनल डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट युनिट’ने सांगितले.
रिसाराल्दा जिल्ह्यातील पुएब्लो रिको या शहराच्या मध्यात झालेल्या या भूस्खलनामुले शहराची मध्यवर्ती वाहतूक ठप्प झाली. मातीच्या ढिगारयाखाली गाडल्या गेलेल्या बसमध्ये 33 प्रवासी होते. ही बस चिखलामध्ये दोन मीटर खोलपर्यंत गाडली गेली होती. याशिवाय 6 प्रवासी असलेली एक कार आणि दोन प्रवासी असलेली एक मोटरसायकल देखील या चिखलामध्ये गाडली गेली.
मदत आणि बचाव कार्यासाठी 70 सदस्यांचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले असून गाडल्या गेलेल्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहेत. 24 तासांच्या प्रयत्नांनंतरही या प्रवाशांना बाहेर काढले जाऊ शकलेले नव्हते. कोलिंयाचे अध्यक्ष गस्ताव पेट्रो यांनी या दुर्घटनेद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडीतांना सर्व मदत देण्याची हमी देखील त्यांनी दिली आहे.





