Satara | वाडा कुंभरोशीत आरोग्य शिबिराचा 325 रुग्णांना लाभ

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – आ. मकरंद पाटील यांच्या संकल्पनेतून व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या विशेष सहकार्यातून मोफत आरोग्य शिबिराचे वाडा कुंभरोशी येथे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिराचा 325 गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषध उपचार व मोफत मेडिसिन देण्यात आले तसेच एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या आरोग्य शिबिराचे संयोजन श्री क्लिनिक वाडा कुंभरोशी येथील डॉ. महेंद्र भिलारे व डॉ. प्रतीक्षा भिलारे यांच्यामार्फत करण्यात आले. आरोग्य तपासणी झाल्यानंतर राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या वतीने अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिराबरोबर लोकांच्या महसूल प्रशासनात असलेल्या अडचणींच्या देखील निपटारा करण्यात आला. या वेळेला प्रामुख्याने रेशन कार्ड वरची नाव कमी करणे वाढवणे व यावेळी लाडकी बहीण योजनेतील राहिलेल्या महिलांचे देखील फॉर्म भरण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भिलारे, रोहित ढेबे , अभय डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, सचिन उतेकर, सुरेश सावंत, सुरेश जाधव, कारंडे ,लक्ष्मण मोरे , यशवंत गायकवाड व वाडा कुंभरोशी व पंचक्रोशीतीलग्रामस्थ उपस्थित होते.





