पिंपरी | लोणावळ्यात ३० तासात ३०४ मीमी पाऊस

लोणावळा, (विशाल पाडाळे) – लोणावळा शहर आणि परिसरात शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले, तर रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे ओव्हरफ्लो झालेल्या भुशी धरणातून पायऱ्यांवर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षा कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून रविवारी भुशी धरण पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
लोणावळा शहरात शनिवारी सकाळी ७ ते रविवारी सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात तब्बल २१६ मिलीमीटर आणि रविवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ८८ मिलिमीटर असा एकूण ३० तासात ३०४ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. विशेषतः शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे पावसाचा जोर वाढला होता.
त्यामुळे शहरातील नारायणी धाम परिसर, बद्री विशाल सोसायटी, नांगरगाव परिसर, भांगरवाडी मधील काही परिसर आणि शेतकरी पुतळा परिसरात पाणी भरले गेले होते. तर दुसरीकडे डोंगर भागावर पडत असलेल्या प्रचंड पावसाच्या सरीमुळे धबधबे ओसंडून वाहत होते. भुशी धरणाच्या बॅक वॉटरला असलेल्या धबधब्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणाच्या जलसाठ्यात येत होते. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता.
पर्यटकांना सक्त सुचना
भुशी धरणावर पर्यटनासाठी येणारे पर्यटक धरणाच्या भिंतीवर बसून, तसेच पायऱ्यांवर बसून पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असतात. मात्र वाढत्या पावसासोबत पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग वाढत गेल्याने पोलीस प्रशासनाने रविवारी भुशी धरणावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली.
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पर्यटकांनी अतिउत्साहात कोणत्याही धबधब्याखाली किंवा डोंगर, कडेकपारीमध्ये जाऊ नये, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले होते.





