‘प्रत्येक टेंडरमध्ये मंत्र्यांचे ३० टक्के कमिशन निश्चित’, सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

पटना: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तेजस्वी म्हणाले, “सर्व विभागांमध्ये टेंडरचा धडाका सुरू आहे, आणि यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. प्रत्येक टेंडरमध्ये मंत्र्यांचे 30 टक्के कमीशन निश्चित आहे.” त्यांनी पुढे असा दावा केला की, या भ्रष्टाचारातून निवडणुकीचा खर्च भागवला जात आहे.
बिहारामध्ये एनडीएची सत्ता येणार नाही –
यंदा बिहारामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात तेजस्वी म्हणाले, “एनडीए कितीही प्रयत्न करो, बिहारामध्ये त्यांची सत्ता येणार नाही. त्यामुळेच टेंडरचा धडाका लावून खजिना लुटला जात आहे.” त्यांनी सरकारवर बिहारच्या खजिन्याची लूट करण्याचा आणि बांधकामाच्या नावाखाली निधीचा अपव्यय करण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “ही लोकं स्वतःच म्हणतात की, पुन्हा सत्ता येणार नाही, त्यामुळे उरलेल्या वेळेत टेंडर काढा आणि लूट करा.”
बिहारच्या ठेकेदारांना टेंडर नाही –
तेजस्वी यांनी राज्यात आर्थिक अराजकतेचा आरोपही केला. ते म्हणाले, “या सर्व कामांचा बोजा पुढील सरकारवर पडणार आहे. त्यासाठी निधी कुठून येईल?” त्यांनी असा दावा केला की, बिहारच्या स्थानिक ठेकेदारांना टेंडर दिले जात नाहीत, तर बाहेरील लोकांना कामे दिली जात आहेत. “बाहेरील लोक बिहारात येऊन कामे करतील,” असे ते म्हणाले.
महिला संवाद यात्रेवर प्रश्नचिन्ह –
तेजस्वी यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “बिहारच्या जनतेच्या पैशातून दिल्लीतून 600 डिजिटल रथ मागवून ‘महिला संवाद’च्या नावाखाली लूट केली जात आहे. तब्बल 225 कोटी रुपये ही किती मोठी रक्कम आहे, जी निवडणूक प्रचारासाठी सरकारी खजिन्यातून खर्च केली जात आहे?” या आरोपांनी बिहारच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून, निवडणुकीपूर्वी हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.





