धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा येथील अल्पवयीन तीन मुलींनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला आणि थेट कोरियाचा मार्ग धरला. दक्षिण कोरियातील डान्स ग्रुप बीटीएसला भेटण्यासाठी त्यांनी हा बनाव केला. घरातून 5 हजार रुपये घेऊन या तिन्ही मुली घराबाहेर निघाल्या. कुटुंबियांकडून मुलींचे अपहरण झाल्याची बातमी पोलिसांना दिली आणि अवघ्या 30 मिनिटांत पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले. विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे या तीन पैकी दोन मुली या केवळ 11 वर्षांच्या आहेत आणि एक 13 वर्षांची आहे. इतक्या कमी वयात त्यांनी हा सगळा प्लॅन केला आणि त्यानुसार घरातून पैसे घेऊन त्यांनी दक्षिण कोरियाचा रस्ता देखील धरला. आमच्या गळ्याला चाकू लावून अपहरण करण्यात आले आहे असे सांगून यांनी पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे या मुली सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या मुली दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध बीटीएस-व्ही या कोरियन सिंगर आणि या ग्रुपच्या फॅन आहेत. कोणत्याही परिस्थितीत या ग्रुपला भेटण्याचा निर्धार त्यांनी केला होता आणि त्यानुसार प्लॅन करत घरातून पळ काढला होता. उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या मुलींना शोधण्याची मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. ही मोहीम पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून सर्वांचे कौतुक होत आहे. गावखेड्यातही सोशल मिडीयाचे लोण सध्याच्या या तरुण पिढीवर मोबाइलचा फार मोठा परिणाम आहे. त्यात सोशल मीडियचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. सोशल मीडियामुळे गावा-खेड्यातील मुला मुलींना देखील वेड लावले आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्यांकडे व्यवस्थित लक्ष देणे किती गरजेचे आहे हे पुन्हा अधोरेखित होत आहे.