नंदुरबार – गेल्या 3 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात 3 जण वाहून गेल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यात घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, गत 3 दिवसांपासून नंदुरबारच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे आलेल्या पुरात अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बर्डी येथील शासकीय आश्रम शाळेतील रोजंदारी शिक्षक ईश्वर रामा वसावे (रा.गमन) हे रोयाबारीपाडा येथील दुकानावरून आपल्या घरी परतत असताना नदीत वाहून गेले. रविवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळला. याशिवाय गुलीअंबरचे संतोष रमेश वसावेही पुरात वाहून गेले. याशिवाय अक्राणी तालुक्यातील 1 जणही पुरात वाहून गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे आतापर्यंत 42 घरांची पडझड झाली असून, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.