नवी दिल्ली : बिहारमध्ये मतदारयाद्या पडताळणी (एसआयआर) नंतर ३ लाख मतदार वाढल्याकडे कॉंग्रेसने लक्ष वेधले. त्यावर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशातून संबंधितांच्या नावांचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आला, असे आयोगाने अधोरेखित केले. विधानसभा निवडणुकीआधी बिहारमध्ये मतदारयाद्यांची पडताळणी झाली. त्यानंतर ३० सप्टेंबरला अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबरला बिहार निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यावेळी बिहारमध्ये ७.४२ कोटी मतदार असल्याचे आयोगाने सांगितले. त्याचा संदर्भ कॉंग्रेसने सोशल मीडियातील पोस्टमधून दिला. तसेच, नंतर आयोगाच्याच माहितीनुसार ती संख्या ७.४५ कोटी असल्याचे सूचित झाले, याकडे कॉंग्रेसने अंगुलिनिर्देश केला. त्यावर निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. आधीची एकूण मतदार संख्या अंतिम मतदारयाद्यांवर आधारित होती. मात्र, निवडणूक नियमांनुसार पात्र मतदार त्यांची नावे समाविष्ट करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस आधीपर्यंत अर्ज देऊ शकतात. त्यामुळे १ ऑक्टोबारपासून निर्धारित कालावधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. नियमांनुसार पात्र मतदारांची नावे याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यातून सुमारे ३ लाख मतदारांची भर पडली. मतदारांची सुधारित संख्या मतदानानंतरची आकडेवारी जाहीर करताना निवडणूक आयोगाने नमूद केली, अशी स्पष्टोक्ती त्या अधिकाऱ्यांनी केली. बिहारमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक झाली. पहिल्या टप्प्यासाठी १७ ऑक्टोबर, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.