भारतातील 29 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

मॉन्ट्रियल – जगातील सर्वच देशांच्या पर्यावरणाला विविध कारणांनी धोका उत्पन्न होत आहे. याबाबत जागरूक असलेल्या आणि संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय निसर्ग संरक्षण संघटनेने नुकतीच नामशेष होणाऱ्या प्रजातींची यादी जाहीर केली. यामध्ये भारतातील 29 प्रजातींचा समावेश आहे.
फक्त भारतातच आढळणारा पांढऱ्या गालांचा डान्सिंग फ्रॉग किंवा अंदमानच्या समुद्रात आढळणारा शार्क मासा आणि हिमालयात सापडणारी एक विशिष्ट वनस्पती या प्रजाती संकटात असल्याचा दावा या संघटनेने केला आहे. निसर्ग संरक्षक संघ दरवर्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींची लाल यादी जाहीर करते. यंदा जाहीर केलेल्या यादीत भारतातील या प्रजातींचा समावेश आहे.
ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण आणि मासे पकडण्याच्या विविध प्रकारच्या पद्धती यामुळे या प्रजाती संकटात आल्या असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. जगातील 15 हजार पेक्षा जास्त संशोधक या संघटनेसाठी काम करतात. कोणत्या प्रजाती संकटात आहेत आणि त्या प्रजाती वाचवण्यासाठी काय करायला हवे. याबाबतचे संशोधन या संशोधकांच्या माध्यमातून केले जाते.
भारतात मोठ्या प्रमाणात जैवविविधता असून आधुनिक काळातील प्रगतीची दुसरी बाजू असलेल्या प्रदूषणामुळे अनेक प्रजाती संकटात येत आहेत, असे या संघटनेचे म्हणणे आहे. भारतातील उपलब्ध जमीन, समुद्र आणि गोड्या पाण्याचे साठे या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या या सर्व प्रजाती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पण यांची काळजी न घेतल्यास त्या आगामी कालावधीमध्ये त्या संकटात येऊ शकतात, असा इशारा या संशोधकांनी दिला आहे. सध्या भारतातील 1355 प्रजातींचा अभ्यास सुरू असून त्यापैकी 29 प्रजातींना यावर्षी या संघटनेने लाल यादीमध्ये टाकले आहे.





