चोरलेल्या पैशातून घेतल्या म्हशी
पुणे: अंगडियाची 29 लाखाची रोकड चोरणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्या ताब्यातून 10 लाख 50 हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली. उर्वरीत रकमेतून आरोपींनी म्हशी तसेच गृहपयोगी वस्तू खरेदी केल्या आहेत. तर काही पैसे ऐषोरामासाठी वापरण्यात आले. अंगडियाकडील एका माजी कर्मचाऱ्यानेच मित्रांच्या मदतीने हा कट रचला होता.
गजानन उर्फ पिंटु पांडूरंग सुवर्णकार(30,रा.गुरदाळ,ता.देवणी, जि.लातूर) , संदीप तानाची बिरादार(22), मंगेश रमेश बिरादार(28), सुमीत बालाजी पाटील(19), राहुल देवीदास सुर्यवंशी(20, सर्व रा.लातूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी विठ्ठल श्रीनिवासराव करजगीकर यांनी दि.10 ऑगस्ट रोजी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी हे नांदेड येथे एका अंगडियाकडे काम करतात. ते अंगडियाने दिलेली 29 लाख 24 हजार 650 रुपयांची रोकड घेऊन मुंबईला खासगी बसने चालले होते. पुण्यात येरवडा येथील मशीदच्या शेजारील मोकळ्या जागेत बस थांबल्यावर ते सॅक बाजूला ठेऊन लघुशंकेसाठी गेले होते. दरम्यान यांची रोकड असलेली सॅक चोरण्यात आली.
माजी कर्मचारी गजानने रचला कट
यातील मुख्य आरोपी गजानन हा पुर्वी संबंधीत अंगडियाकडे कामाला होता. त्याचा अपघात झाल्याने त्याने नोकरी सोडून दिली होती. यामुळे त्याला अंगडियाकडून पैसे कधी, कोठे कसे पाठवले जातात याची माहिती होती. त्याने गावाकडील मित्रांना एकत्र करुन रोकड लूटण्यांचा कट रचला. त्यानूसार पुण्यात रहाणाऱ्या सुमित पाटीलकडे इतर आरोपी दोन दिवस अगोदर रहायला आले. गुन्हा करण्यासाठी सुमितची मोपेड वापरण्यात आली तर राहुल सुर्यवंशी याने बॅग चोरुन आणली. काही गोंधळ झाला असता तर दोघांच्या मदतीला धावून जाण्यासाठी इतर आरोपी घटनास्थली थांबले होते. पैसे चोरल्यानंतर ते सुमितच्या घरी एकत्र आले. तेथे त्यांनी पैशाची वाटणी करुन घेतली. यानंतर काही पैसे ऐषोरामात घालवून गावाला गेल्यावर म्हशी तसेच गृहपयोगी वस्तूंची खरेदी करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी बाळु बहिरट, हणमंत जाधव, संदिप मांजुळकर, पंकज मुसळे, अशोक गवळी, मनोज कुदळे, मोहीते, कारखेले, समीर भोरडे, राहुल परदेशी, सकट, सुनिल नागलोत, विष्णु सरादे, कुंवर आणी पाडोळे यांच्या पथकाने केली.