पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिग्यांवरील कारवाईने चांगलाच जोर पकडला आहे. गेल्या वर्षभरात २९ बांगलादेशी नागरिक आणि चार रोहिग्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामुळे शहरात अवैध वास्तव्य करणार्या घुसखोरांचे धाबे दणाणले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात पोलिसांनी घेतलेल्या शोध मोहिमेमध्ये आतापर्यंत २९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच देहूरोड परिसरातून चार रोहिग्यांना अटक केली आहे. याबाबत शहरातील दहा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंवरील होणारे अन्याय, अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात अवैधपणे घुसखोरी करून राहणार्या बांगलादेशींवरील कारवाई पोलीस प्रशासनाने तीव्र केली आहे. आर्थिक टंचाई, अशिक्षितपणा व प्रचंड बेरोजगारी यामुळे बांगलादेशातील नागरिकांकडून रोजगारासाठी अनेक बांगलादेशी भारतात छुप्या मार्गाने प्रवेश करून दाखल होतात. सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या व अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात. अवजड काम तसेच बांधकाम क्षेत्रात मजुरी, डाइंग सायजिंगमध्ये बॉयलर अटेंडंट व प्लंबिंगचे काम करून अनेक ठिकाणी चाळींमध्ये हे नागरिक आपली ओळख लपवून राहतात. कारवाई तीव्र करणार बांगलादेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात येते. मागील काही दिवसांपासून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र अटक बांगलादेशी नागरिक देशविघातक कृत्याशी संबंधित आहेत किंवा नाही, याचा ही तपास पोलीस यंत्रणा करीत असून घुसखोरी करून शहरात रहाणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने यापुढेही अवैध बांगलादेशी नागरिकांवर कारवाई तीव्र करण्यात येईल अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली आहे. विधानसभेतही मुद्दा उपस्थित कुदळवाडी, चिखली येथील गोदामांना लागलेल्या आगीनंतर विधानसभेत आमदारांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. कुदळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र चिखली परिसरातून बांगलादेशी किंवा रोहिग्यांना अटक केल्याची एकही नोंद पोलिसांकडे नाही. ६२ पासपोर्ट केले रद्द वर्षभरात स्थानिक पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने बांगलादेशी नागरिकांनी काढलेले ६२ पासपोर्ट गेल्या वर्षभरात रद्द केले आहेत. तसेच आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेले पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आणि आधारकार्डही रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. बांगलादेशी नागरिकांवर वर्षभरात झालेली कारवाई पोलीस ठाणे कारवाईचा दिनांक अटक आरोपींची संख्या महाळुंगे एमआयडीसी १० जानेवारी ०१ निगडी २० जानेवारी ०५ पिंपरी ९ फेब्रुवारी ०१ भोसरी २६ मे ०८ भोसरी एमआयडीसी ८ जून ०४ सांगवी १ ऑगस्ट ०४ दापोडी १५ ऑक्टोबर ०१ चाकण २३ डिसेंबर ०२ तळेगाव एमआयडीसी ३० डिसेंबर ०३ एकूण संख्या २९ रोहिंग्यावरील कारवाई देहूरोड २७ जुलै ०४