इस्त्रायलच्या हल्ल्यांत लेबनॉनमध्ये आतापर्यंत २७९० जणांचा मृत्यू

बेरूत – इस्त्रायली सैन्याने लेबनॉनच्या पूर्व भागात असलेल्या बालबेक शहरातील लोकांना बुधवारी सकाळी हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आणि रात्री बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली. हवाई हल्ल्यात जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध नाही. बालबेक हे रोमन साम्राज्याचे तीन हजार वर्षे जुने अवशेष असलेले शहर आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोने 1984 मध्ये याला जागतिक वारसा क्षेत्र घोषित केले. इस्रायलने मंगळवार-बुधवारी रात्री लेबनॉनच्या बेका खोऱ्यातही अनेक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये खोऱ्यात वसलेल्या शहरांमध्ये 60 हून अधिक लोक मारले गेले आणि डझनभर जखमी झाले. इस्रायली सैन्याने लेबनॉनमध्ये 8 ऑक्टोबर 2023 पासून हिजबुल्लासोबत सुरू असलेल्या लढाईत 2,790 लोक मारले आहेत.
जर इस्रायल हल्ले थांबवण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्या प्रस्तावावर विचार करू आणि आमचे प्रत्युत्तराचे हल्ले थांबवू, असे हिजबुल्लाहचे नवे प्रमुख नइम कासिम यांनी म्हटले आहे. हिजबुल्लाचा प्रमुख बनल्यानंतर कासिमने आपल्या पहिल्या प्री-रेकॉर्ड केलेल्या संदेशात हे सांगितले. बुधवारी गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 20 जण ठार झाले आहेत. तर बीत लाहिया येथे मंगळवारी बेपत्ता झालेले ९३ जण अद्याप सापडलेले नाहीत.
इस्रायलच्या हल्ल्यात हे लोक मारले गेले असून त्यांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायलचे सैन्य गेल्या तीन आठवड्यांपासून या भागात रणगाडे हल्ले करत आहे. यामुळे लाखो पॅलेस्टिनी लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.
तर युनायटेड नेशन्सने म्हटले आहे की मदत एजन्सीचे कामकाज बंद करण्याच्या इस्रायलच्या निर्णयामुळे युद्धादरम्यान गाझाची जीवनरेषा तुटली आहे. इस्रायलचा हा निर्णय गाझा, वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील निर्वासितांसाठी आपत्ती ठरू शकतो, असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे.





