Bank News : बँकांबाबत मोठी बातमी! 27 सप्टेंबरला रविवार असूनही बँका सुरू राहणार; जाणून घ्या कारण
Bank News : 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवार असूनही बँका सुरू राहणार आहेत. 28 ते 30 सप्टेंबरच्या प्रस्तावित बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Bank News : बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 27 सप्टेंबर 2026 रोजी रविवार असूनही देशातील बँका सुरू राहणार आहेत. प्रस्तावित तीन दिवसांच्या बँक संपाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 27 सप्टेंबर रोजी बँकांच्या शाखा, कार्यालये आणि संबंधित सेवा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँका या दिवशी नियमितपणे काम करतील.
28 ते 30 सप्टेंबरदरम्यान संप
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) 28 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधील नियमित सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर 27 सप्टेंबरला बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना संपापूर्वी रोख रक्कम काढणे, धनादेश, कागदपत्रे किंवा शाखेशी संबंधित इतर महत्त्वाची कामे पूर्ण करता येतील.
पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही प्रमुख मागणी
बँक कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करणे याचा समावेश आहे. या मागणीसह अन्य प्रलंबित प्रश्नांवरून संपाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, प्रस्तावित संप टाळून चर्चेतून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन वित्त मंत्रालयाने बँक कर्मचारी संघटनांना केले आहे.





