हवामानातील बदलामुळे 250 हेक्टर फूलशेती संकटात

रोगाचा प्रार्दूभाव : उत्पादनात 70 टक्क्यांहून अधिक घट होणार
पवनानगर – मावळ तालुक्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका फूल शेतीला बसला आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे फूलशेतीवर रोगाचे प्रमाणही वाढले आहे. सर्वच फूल शेतीवर या ढगाळ वातावरणामुळे फूल उत्पादनात फरक पडला.
मावळ तालुक्यात 250 हेक्टरपर्यंत फूल शेती आहे. सकाळी धुके, दिवसभर उन व दुपारनंतर पाऊस या सततच्या वातावरणातील बदलामुळे गुलाब शेतीवर डावणी (मोठ्या प्रमाणात पाने गळती होणे) व थ्रीप्स (लहान लहान पाखरे फुलातील पाकळ्यांमधील रस शोषन केल्यामुळे फुले खराब होतात) या किडीच्या प्रादुर्भावामुळे गुलाब शेतीच्या उत्पादनात 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर हवामानातील बदलामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. याशिवाय बुरशी आल्यामुळे पानांची पूर्णपणे गळती होते. जरबेराच्या पानांवरती बुरशी रोगाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जरबेरा फूल उत्पादनात ही 40 टक्क्यांनी घट झालेली आहे, अशी माहिती जरबेरा फूल उत्पादक शेतकरी सोमनाथ ठाकर यांनी दिली आहे.
सध्याच्या बदल्या हवामानाचा फटका भातपिकाबरोबरच पॉलीहाऊसमध्ये असणाऱ्या फूल शेतीला फटका बसला आहे, यामुळे फूल उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे.
फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात…
शासनाने फक्त भातशेतीचेच पंचनामे करण्यास सांगितले आहे; मात्र वारंवार परकीय चलन मिळवूण देणार फूल उत्पादकला शासनाकडून कुठल्याही प्रकारची भरपाई मिळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी येणाऱ्या वादळी पावसामध्ये पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; परंतु शासनाने त्याचे पंचनामे देखील केले नाही. आता देखील शासन भात पिकाचेच पंचनामे होत आहे. फूल उत्पादकाचे पंचनामे होत नाही, हा व्यवसाय भविष्यात मोठ्या प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर पंचानामे करुन नुकसान भरपाई मिळवावी, अशी मागणी मुकूंद ठाकर, ज्ञानेश्वर ठाकर, विश्वनाथ जाधव, माऊली आडकर, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर आदी शेतकऱ्यांनी केली आहे. फुलांचा हंगाम असताना देखील सहा महिने पावसाचे असल्यामुळे फूल उत्पादक शेतकरी सहा महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे.




