पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीपूर्वी ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पुणे – खरीप हंगामात पावसाने एकवीस दिवसांहून अधिक ओढ दिल्याने केंद्राच्या निकषानुसार पीक विमा योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के नुकसान भरपाई आगाऊ देण्यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यांत अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25 टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
यावर्षी राज्यात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतरपिकाच्या सुद्धा विमा काढण्यात आलेला आहे. राज्य शासनाने एक रुपया शेतकऱ्यांना भरायला सांगितले होते. उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनाने भरला आहे. देशात हे पाहिले उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची 25 टक्के रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे. याशिवाय 65 मिलीमीटर पेक्षा सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, असेल तिथे एसडीआरएफ व एनडीआरएफ नियमानुसार शेतकऱ्यांना मदत करता येते. ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
अधिसूचना काढली
पुणे जिल्ह्यासह 22 जिल्ह्यांतील 457 महसूल मंडळांमध्ये 21 एकवीसहून अधिक दिवस पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या निकषानुसार, एकवीसपेक्षा अधिक दिवस पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांना खरीप पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ दिली जाते. पावसाने दडी मारलेल्या भागात कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर अठरा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आहे.





