अहमदाबाद – एअर इंडियाच्या AI-171 विमानाने अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मेघनीनगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एकमेव प्रवासी, विश्वशकुमार रमेश (सीट 11A), सुदैवाने बचावला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमानातील १२ क्रू मेंबर्सचाही मृत्यू झाला, त्यापैकी चार मराठमोळे क्रू मेंबर्स होते. यामुळे महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राचे चार क्रू मेंबर्स – या दुर्घटनेत कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल (पवई, मुंबई), अपर्णा महाडिक (मुंबई), दीपक पाठक (बदलापूर) आणि रोशनी सोनघरे (डोंबिवली) यांचा मृत्यू झाला. सुमित यांच्या वडिलांसोबत पवईच्या जलवायू विहारात राहणाऱ्या कुटुंबाला स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी सांत्वन भेट दिली. अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या. अमोल स्वतः एअर इंडियाचे पायलट आहेत. तटकरे गोरेगावातील अमोल यांच्या घरी पोहोचले, तर मंत्री योगेश कदम यांनी महाडिक कुटुंबाशी सहवेदना व्यक्त केली. दीपक पाठक यांनी उड्डाणापूर्वी आईशी फोनवर बोलणे केले होते, पण त्यानंतर संपर्क तुटला. त्यांच्या बहिणीने “फोन लागतो, पण उचलला जात नाही,” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया दिली. रोशनी सोनघरे फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होत्या. सांगोल्याचे दाम्पत्य – सांगोला तालुक्यातील हातीद गावचे महादेव तुकाराम पवार (वय ६७) आणि पत्नी अशा पवार (वय ५५) यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी ते प्रवास करत होते. नडीयाद येथील कापड मिलेतून निवृत्त झालेले हे दाम्पत्य अहमदाबादला स्थायिक होते. मागील पंधरवड्यात ते गावी आले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि तीन भाऊ आहेत. तपास आणि मदत कार्य – विमानाने दुपारी १:३८ वाजता उड्डाण केले, पण मेडे कॉलनंतर एटीसीशी संपर्क तुटला. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे २९० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अहमदाबाद पोलिसांनी हेल्पलाइन (०7925620359) जारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युके पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी शोक व्यक्त केला.