शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ

मुंबई : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने सुरु असून ०६ फेब्रुवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस सुरु रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्राने सोयाबीनला महाराष्ट्रात २४ दिवसांची तर तेलंगणामध्ये १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे. आता या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा हमीभावाने सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे.
गेल्या हंगामात महाराष्ट्रात सोयाबीनची मोठी खरेदी झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक या राज्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ आजपासून पुढे २४ दिवस असेल. ही खरेदी सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन करता येणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या निर्णयाची माहिती दिली.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणची खरेदी केंद्र सुरु नाहीत. जी केंद्र सुरु आहेत तिथे पॅकिंगसाठी पुरेसा बारदान उपलब्ध करुन द्यावा. सरकारने त्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे. निधी उपलब्ध करुन द्यावा आणि अधिक मात्रेने सोयाबीनची खरेदी करावी, मागणीनुसार सरकारी सोयाबीन केंद्र वाढवावे अशी मागणी देखील अजित नवलेंनी केली.
दरम्यान, सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी केली जात होती. अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहेत.
या वर्षी राज्यात ६० ते ६५ लाख मॅट्रिक टन इतके सोयाबीन उत्पादन झाले होते. त्यापैकी १३ लाख मॅट्रिक टनची खरेदी सरकार करणार आहे. मात्र आतापर्यंत फक्त ७ ते ८ लाख मॅट्रिक टनचा खरेदी झाली होती. यामुळे शिल्लक सोयाबीन काय करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र, केंद्र सरकारनं आणखी 24 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.





