Satara News : पावसाचं थैमान..! साताऱ्यातील 239 शाळांना महिनाभर सुट्टी, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने संभाव्य धोके टाळण्यासाठी शिक्षण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील 239 प्राथमिक शाळांना 12 ऑगस्टपर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये महाबळेश्वर (119 शाळा), पाटण (181 शाळा) आणि जावळी (39 शाळा) तालुक्यांचा समावेश आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी ही माहिती दिली.
नागपुरातही पावसाचा हाहाकार
नागपूर जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संततधारेमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहर आणि ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत केले आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व खाजगी आणि शासकीय शाळा व महाविद्यालयांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
नागपूरमध्ये आतापर्यंत 172.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे जिल्ह्यातील पावसाची 40 टक्के तूट भरून निघाली आहे. सर्वाधिक पाऊस भिवापूर (118.6 मिमी), मौदा (100.3 मिमी), रामटेक (107 मिमी), काटोल (100.3 मिमी), पारशिवनी (99.9 मिमी), कामठी (88.8 मिमी), कुही (98.2 मिमी), उमरेड (80.8 मिमी), नागपूर शहर (67.8 मिमी), नागपूर ग्रामीण (64.7 मिमी), सावनेर (65.2 मिमी), कळमेश्वर (68.7 मिमी), हिंगणा (57.5 मिमी) आणि नरखेड (53.6 मिमी) येथे नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 48.9 टक्के म्हणजेच 148.9 मिमी पाऊस पडला आहे.
राज्यातील अनेक भागांना ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने (IMD) सातारा आणि नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केले आहेत. साताऱ्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर नागपूरमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे रस्ते बंद, पूर आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
सातारा आणि नागपूर प्रशासनाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी विशेष कार्ययोजना तयार केली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर-टपोला मार्ग बंद करण्यात आला असून, कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. नागपूरमध्ये सखल भागात पाणी साचल्याने प्रशासनाने आपत्कालीन संपर्क क्रमांक (112) उपलब्ध करून दिले आहेत.





