दहावी, बारावी अन् मेडिकल, अभियांत्रिकीची 232 बनावट प्रमाणपत्र ताब्यात

नगर – बनावट गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र प्रकरणाच्या तपासात आरोपीने सन 2019 पासून दिलेली तब्बल 232 बनावट प्रमाणपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यात दहावी, बारावीसह पदवी, पदविका प्रमाणपत्रे, तसेच मेडिकल व अभियांत्रिकी परीक्षेची प्रमाणपत्रेही आढळून आली आहेत. दरम्यान, आरोपीने जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही अशी प्रमाणपत्रे दिलेली असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नावाने दहावी व बारावीचे बनावट गुणपत्रके प्रमाणपत्रे, तसेच विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी प्रमाणपत्रे, शाळांचे बनावट दाखले तयार करून त्याची नगरमध्ये 50 ते 60 हजार रुपयांना विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. नगर शहरातील रुद्र एज्युकेशन सोसायटीच्या पॅरामेडिकल कॉलेज येथील अशोक नामदेव सोनवणे (वय 37, रा. द्वारकाधिश कॉलनी, आलमगीर, भिंगार) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. सोनवणे याने बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे दिल्ली येथील सचिन व चेतन शर्मा यांच्याकडून तयार करुन घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असून, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. ज्या व्यक्तींनी ही बनावट प्रमाणपत्रे तयार केली, त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
डी.वाय. पाटील विद्यापीठाचे प्रमाणपत्र
सोनवणे याने शिवाजी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अशा विविध विद्यापिठांची बनावट प्रमाणपत्रे तयार करुन ती 50 ते 60 हजार रुपयांना विक्री केल्याचेही समोर आले होते. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या प्रमाणपत्रांमध्ये डी. वाय. पाटील विद्यापीठाची अनेक प्रमाणपत्रे तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत दहावी, बारावी, बीकॉम, बीएससी, बीए, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर विविध अभ्यासक्रमांचा समावेश असलेली 232 प्रमाणपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.




