Ganeshotsav 2026 : 21 हजार पाणीपुरींच्या पुऱ्यांतून साकारला 13 फूट उंच गणपती; पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी
Ganeshotsav 2026 : पुण्यात गणेश भेळने २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून १३ फूट उंच गणपती साकारला आहे. पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या या उपक्रमाची खासियत जाणून घ्या.

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या कल्पनांतून गणेशमूर्ती साकारल्या जातात. यंदा गणेश भेळने २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांचा वापर करून १३ फूट उंच आणि १० फूट रुंद गणपती साकारला आहे. नामदार गोखले पथ अर्थात फर्ग्युसन रस्त्यावरील गणेश भेळच्या दालनाबाहेर ही मूर्ती उभारण्यात आली आहे.
गणेश भेळचे संस्थापक रमेश गुडमेवार यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी छाया गुडमेवार, संचालक रुपेश गुडमेवार, दिनेश गुडमेवार आणि अनुष्का गुडमेवार उपस्थित होते.
पुऱ्यांपासून गणपती साकारण्याचे गणेश भेळचे हे चौथे वर्ष आहे. दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन हा उपक्रम राबविला जातो. यंदाच्या मूर्तीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू होती. या मूर्तीसाठी लागणाऱ्या सर्व पुऱ्या गणेश भेळच्या कारखान्यात तयार करण्यात आल्या. कलाकार प्रशांत साळुंखे यांनी मूर्ती साकारली आहे.
मूर्तीवरील पुऱ्या १२ दिवस टिकून राहाव्यात यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पुऱ्या तयार करताना उरलेल्या किंवा वाया जाणाऱ्या पिठाचा पुनर्वापर करण्यात आला. मूर्तीच्या संरचनेसाठी बांबू आणि कागदासारख्या नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
गणेश भेळचे संचालक रुपेश गुडमेवार म्हणाले, ‘‘नागरिकांचा मिळणारा प्रतिसादच आम्हाला असे उपक्रम राबविण्याची प्रेरणा देतो. पुनर्वापर आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
संचालक दिनेश गुडमेवार म्हणाले, ‘‘गणेश हे नाव आमच्यासाठी केवळ व्यवसायाचे नाव नसून आयुष्याशी जोडलेले नाते आहे. पाणीपुरीची प्रत्येक पुरी तयार करताना त्यातून गणेशाची प्रतिमा साकारण्याची कल्पना मनात आली.’’
रमेश गुडमेवार आणि छाया गुडमेवार यांनी १९७८ मध्ये पुण्यात हातगाडीपासून गणेश भेळची सुरुवात केली. अस्सल चव, गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान या मूल्यांवर सुरू झालेला हा व्यवसाय आज पुण्यातील लोकप्रिय खाद्यपदार्थांचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. सध्या गणेश भेळच्या ३५ हून अधिक शाखा असून २२ देशांमध्ये उत्पादनांची निर्यात केली जाते.
पुढील १२ दिवस, म्हणजेच अनंतचतुर्दशीपर्यंत ही आगळीवेगळी गणेशमूर्ती गणेशभक्तांना पाहता येणार आहे. शिवमुद्रा ढोलताशा पथकाच्या वादनाने मूर्ती अनावरणाच्या कार्यक्रमात रंगत आणली.





