इलॉन मस्क यांच्या कार्यपद्धतीवर कर्मचारी नाराज? 21 जणांनी दिला तडकाफडकी राजीनामा, कारण काय?

Elon Musk | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अब्जाधीश इलॉन मस्क हे त्यांच्या निर्णयामुळे सातत्याने चर्चेत आहेत. ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ इफिशिएन्सीची (DOGE) जबाबदारी मस्क यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, हा विभाग सातत्याने वादात अडकत चालला आहे. त्यातच आता विभागातील जवळपास 21 कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.
DOGE कडे सरकारी खर्चात कपात आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या विभागाकडून वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. या विभागाने विविध सरकारी विभागाच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक देशांना अमेरिकेकडून दिला जाणार निधी देखील रद्द करण्यात आला आहे. याशिवाय, काही दिवसापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवत त्यांच्या कामाचा अहवाल देखील मागण्यात आला आहे.
आता मस्क यांच्या कामकाजावर नाराज होऊन DOGE मधील जवळपास 21 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणारे कर्मचारी ‘युनायटेड स्टेट्स डिजिटल सर्व्हिस ’ या विभागात कार्यरत होते.
या कर्मचाऱ्यांनी राजीनाम्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. 21 कर्मचाऱ्यांनी राजीनाम्यात लिहिले की, ‘आम्ही अमेरिकन नागरिकांची सेवा करण्याचा आणि राष्ट्रपतींच्या प्रशासनात संविधानाप्रती आमचा संकल्प टिकवून ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, आता हे स्पष्ट झाले आहे की आम्ही त्या वचनबद्धतेचे पालन करू शकत नाही.’
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनांतर्गत संघीय सरकारमध्ये मस्क यांनी नियुक्त केलेले अनेक जण राजकीय विचारसरणीचे आहेत. त्यांच्याकडे संबंधित कामासाठी आवश्यक कौशल्य किंवा अनुभव नाही, असेही या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.





