राज्यात २०७ तालुक्यांत कमी पावसाची नोंद; पिकांवर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट

मुंबई – संपूर्ण राज्यभरात १० दिवस उशिरा पेरण्या सुरू झाल्या. आता पावसाने पाठ फिरविल्याने विदर्भ-मराठवाड्यातील पिके संकटात सापडली आहेत. राज्यातील २०७ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात उन्हाचा चटका वाढल्याने पिके कोमेजत असून पिकांची वाढ खुंटली आहे. अशा स्थितीत पिकांची वाढ करण्यासाठी लागणा-या खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातून खरिपाच्या उत्पादनाला मोठा फटका बसण्याचा धोका आहे.
संपूर्ण राज्यभरात ३५८ तालुके आहेत. यातील २०७ तालुक्यांमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणचे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके संकटात सापडली आहेत. वाढीच्या अवस्थेत पाणी न मिळाल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. यात अल्पावधीत हाती येणा-या पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका आहे.
जुलै महिन्यातील कसर भरून काढताना बुधवार, ६ ऑगस्ट रोजी शहरात पाऊस धो-धो बरसला. मध्यरात्री २ वाजता सुरू झालेला पाऊस सकाळी ८ वाजेपर्यंत पडत होता. पाच तासांत १०९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली असून, घरांमध्ये आणि शाळांमध्येही पाणी शिरले आहे.



