Pune District : डिंभे धरण क्षेत्रात कमी पावसामुळे पाणी पातळीत संथ गतीने वाढ

-जादा पर्जन्यवृष्टीमुळे पूर्व भागातील शेतकरी हैराण
मंचर – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात श्रीक्षेत्र भीमाशंकर, हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण, आहुपे खोरे परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने धरणाच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्याउलट तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळा लवकर सुरू झाला असला तरी त्या तुलनेत तालुक्यातील भीमाशंकर, आदिवासी परिसरात अद्यापही म्हणावा असा पाऊस झालेला नाही. काही दिवसापूर्वी तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे. घोडनदी पात्रही भरून वाहत आहे. मात्र, आदिवासी, भीमाशंकर परिसरात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून येत नाही.
सध्या भीमाशंकर खोऱ्यात तुरळक स्वरूपात पाऊस होत असला तरी या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत फारसे वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण भरले म्हणजे तालुक्यातील पाणी प्रश्न वर्षभर मिटतो. त्यामुळे भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस होऊन धरणाच्या पाणी पातळीत कधी वाढ होईल. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.पावसाळा आता सुरू झाला आहे. त्यामुळे आदिवासी भागात जास्तीत जास्त पाऊस होऊन धरण लवकरात लवकर भरावे,अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
आदिवासी भागात पाऊस नसल्याने हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणात जेमतेम १६.३३ टक्के पाणीसाठा गुरुवार, दि.१९ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत झाला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू असताना भीमाशंकर परिसरात पुरेसा पाऊस नसल्याचे दिसून येते.
– दत्ता कोकणे,वरिष्ठ अधिकारी जलसंपदा विभाग, मंचर-निघोट वाडी.





