Honda City Facelift: नव्या अवतारात येतेय होंडा सिटी! टेस्टिंगदरम्यान दिसली झलक; पाहा काय असतील बदल
Honda City Facelift: होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे. नव्या फीचर्स आणि लूकमुळे ही कार पुन्हा एकदा सेडान सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज होत आहे.

Honda City Facelift: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील एक्झिक्यूटिव्ह सेडान सेगमेंटमध्ये लवकरच मोठी खळबळ उडणार आहे. ह्युंदाईने आपली ‘वेर्ना’ फेसलिफ्ट लाँच केल्यानंतर, आता होंडा आपली लोकप्रिय सेडान Honda City चा नवा फेसलिफ्ट अवतार आणण्याच्या तयारीत आहे. नुकतेच ब्राझीलमध्ये टेस्टिंगदरम्यान या कारची झलक पाहायला मिळाली असून, २०२६-२७ च्या लाइनअपमध्ये ही कार प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
डिझाइनमध्ये काय असणार खास? Honda City Facelift
नव्या होंडा सिटी फेसलिफ्टमध्ये मुख्यत्वे कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतील. स्पाय फोटोनुसार, कारचे डिझाइन प्रिमियम सेडान ‘होंडा सिविक’पासून प्रेरित असल्याचे दिसते. कारला नवीन डिझाइनची ग्रिल आणि अधिक उठावदार (Bold) बंपर देण्यात आला आहे. हेडलाइट्सचे डिझाइनही अपडेट करून त्याला अधिक स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. कारला नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे, तर मागील बाजूच्या बंपरमध्येही काही सूक्ष्म बदल (Detailing) करण्यात आले आहेत.
इंटिरिअर आणि हाय-टेक फीचर्स

भारतीय बाजारपेठेचा विचार करता, २०२७ होंडा सिटी फेसलिफ्टमध्ये ग्राहकांच्या पसंतीचे फीचर्स स्टँडर्ड म्हणून दिले जाऊ शकतात. यामध्ये ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश असेल. अपडेटेड सीट अपहोल्स्ट्रीसह ८ इंची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ८-स्पीकर सराउंड साऊंड सिस्टम आणि ॲम्बियंट लाइटिंग यांसारखे फीचर्स कायम राहतील. सुरक्षेसाठी यामध्ये Level 2 ADAS (ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) ची मोठी रेंज आणि पीएम २.५ एअर फिल्टर देखील उपलब्ध असेल.
हेही वाचा – 7 एप्रिलला भारतात होणार धमाका! 9000mAh बॅटरी आणि 165Hz डिस्प्लेसह नवा ‘किंग’ बाजारात
इंजिन आणि परफॉर्मन्स
पॉवरट्रेनच्या बाबतीत कंपनी सध्याचेच पर्याय कायम ठेवण्याची शक्यता आहे. १.५ लिटर, i-VTEC DOHC इंजिन असेल. १२१ PS पॉवर आणि १४५ Nm टॉर्क आणि ६-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असेल. भारतामध्ये ही कार E20 इंधन मानकांनुसार तयार केली जाईल.
कधी होणार लाँच?
मिळालेल्या माहितीनुसार, होंडा ऑगस्ट २०२६ मध्ये ब्राझीलमधील ‘इंटरलागोस फेस्टिव्हल’मध्ये हे मॉडेल सादर करू शकते. त्यानंतर लवकरच हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होईल. भारतात स्कोडा स्लाव्हिया आणि फॉक्सवॅगन व्हर्च्युस यांसारख्या कारशी या फेसलिफ्टची थेट स्पर्धा असेल.
दरम्यान, होंडा सिटी ही भारताची आवडती सेडान राहिली आहे. नव्या फीचर्स आणि लूकमुळे ही कार पुन्हा एकदा सेडान सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज होत आहे.





