Warmest Year : 1901 नंतर 2024 ठरले सगळ्यांत उष्ण वर्ष

नवी दिल्ली : 2024 वर्ष सरले आणि नवीन वर्षाची सुरुवात थंडीने झाली. मागील वर्ष अनेक कारणांमुळे लक्षात राहणार आहे. या सर्व आठवणींमध्ये आणखी एक आठवण राहणार आहे व ती म्हणजे 2024 मध्ये उष्णतेच्या बाबतीत विक्रमी नोंद झाली. 2024 या वर्षाने उष्णतेच्या बाबतीत 2016 चा विक्रम मोडला आहे आणि 1901 नंतरचे सर्वात उष्ण वर्ष होण्याचा विक्रम केला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार, 2024 हे वर्ष 1901 नंतरचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
व्हर्च्युअल प्रेस ब्रीफिंगमध्ये, आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, 2024 मध्ये वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान दीर्घकालीन सरासरी (1991-2020 कालावधी) पेक्षा 0.65 अंश सेल्सिअस जास्त होते. याने 2016 मध्ये स्थापित केलेल्या मागील विक्रमाला मागे टाकले, जेव्हा सरासरी तापमान सामान्यपेक्षा 0.54 अंश सेल्सिअस जास्त होते.
ते पुढे म्हणाले, आयएमडीचा डेटा भारतातील वाढत्या तापमानाचा आणि अनियमित हवामानाचा व्यापक कल दर्शवितो. 2024 मध्ये, उष्णतेच्या लाटा सर्वाधिक काळ टिकल्या आणि त्यासोबतच अनियमित पाऊस झाला. पत्रकार परिषदेत महापात्रा यांनी हवामानविषयक कृती आवश्यक आहे यावर भर दिला. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी तत्काळ आणि समन्वित कारवाई करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
दिल्लीच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर सध्या दिल्लीत थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दिल्लीत अंशत: ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राजधानी दिल्लीतील बहुतांश भागात धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, दिल्लीत दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढेल.
या काळात वाऱ्याचा वेग ताशी 14-18 किमी राहण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत वाऱ्याचा वेग ताशी 8 किमीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. आज किमान तापमान 8 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 17 अंश सेल्सिअस होते.





