Nagar | २०० वर्षांपूर्वीचा हातबॉम्ब केला निकामी

नारायणडोहो, (वार्ताहर): – नगर तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी हातबॉम्ब (हॅन्डग्रेनेड) आढळला. हा बॉम्ब सुमारे २०८ वर्षांपूर्वीचा, सन १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
आज दुपारी नगर तालुका पोलिसांनी व लष्कराच्या पथकाच्या मदतीने सदर बॉम्बचा निर्मनुष्य ठिकाणी स्फोट घडवून तो निकामी केला. तब्बल २०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वीचे जिवंत हातबॉम्ब या गावच्या परिसरात सातत्याने आढळत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नारायणडोहो गावातील बाबासाहेब फुंदे यांच्या शेतात हातबॉम्ब आढळला. त्यांनी यासंदर्भात नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. नगर तालुका पोलिस ठाण्यातील पथक तातडीने घटनास्थळी गेले.
त्या बॉम्बची पाहणी केली. नगर तालुका पोलिस ठाण्यात असलेल्या जुन्या कागदपत्रांची पडताळणी केली असता त्यातील माहितीनुसार हा रशियन बनावटीचा १८१४ मधील हातबॉम्ब असावा.
यापूर्वीही नारायणडोहो परिसरात दोन हातबॉम्ब आढळण्याच्या घटना घडल्या होत्या. ही आत्तापर्यंत तिसरी घटना आहे. यापूर्वी एका घटनेत बॉम्बचा स्फोट होऊन एकजण जखमीही झाला होता.
त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत तातडीने नगरमधील आर्मड कोअर सेंटरला ही माहिती दिली. त्यानंतर लष्काराच्या अधिकाऱ्यांनी व बॉम्बसदृश शोधक पथकाने तेथे जाऊन पाहणी केली.
त्यानंतर दुपारी लष्करी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निर्मनुष्य ठिकाणी या हातबॉम्बचा स्फोट घडवून आणत तो निकामी करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे व महसूल नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत बॉम्बसदृश वस्तू आर्मीकडून नष्ट करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी ,नगर तालुका पोलिस, बॉम्ब शोध पथक, लष्करी अधिकारी उपस्थित होते.
नारायणडोह परिसरात मुघलांची छावणी
इतिहासकाळात नगरमध्ये निजामशाहीची राजवट होती. त्याकाळात निजामशाहीवर अनेकदा मुघल चालून आलेले होते. त्यावेळी मुघलांच्या छावण्या या नारायणडोह, भातोडी या गावांच्या परिसरातच असायच्या.
त्यामुळे या परिसरात नेहमीच इतिहासकालीन वस्तू अधूनमधून आढळून येतात. ५ वर्षापूर्वी सापडलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला होता. त्यामुळे तेव्हापासून परिसरातील विविध गावातील नागरिक इतिहासकालीन वस्तू दिसल्यास त्याबाबत खबरदारी घेत आहे.



