प्राॅपर्टीच्या वादातून कुटुंबातील 2 महिला आणि 2 मुलींना केलं ठार; न्यायालयानं सुनावली ही शिक्षा

ग्वाल्हेर – येथे वर्ष 2016 मध्ये झालेल्या एकाच वेळेस चार जणींच्या हत्यांच्या प्रकरणात सात आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून या सात आरोपींनी दोन महिला आणि दोन मुलींची हत्या करण्यात केली होती. कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून हत्त्या करणे, मृतदेहांची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, पुरावे नाहीसे करणे अशा विविध आरोपांखाली हा खटला ग्वाल्हेर न्यायालयात चालवण्यात आला होता.
याप्रकरणी 29 फेब्रुवारी 2016 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सरकारी वकील घनश्याम मंगल यांनी सांगितले की, न्यायालयाने महेश गोस्वामी, दीपक गोस्वामी, देवेंद्र गोस्वामी, विजय उर्फ ब्रजकिशोर गोस्वामी, गंगाबाई, उमा गोस्वामी, सुरभी गोस्वामी यांना दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जनकगंज आणि बहोदापूर भागात कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून दोन महिला आणि दोन मुलींची हत्या करून मृतदेह फेकण्यात आले होते. 29 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले होते. रिंकी गोस्वामी, ईश्वरी देवी, मानवी आणि चेतना गोस्वामी अशी मृतांची नावे आहेत.
या चौघींना काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यामध्येच चौघींचाही अंत झाला होता. मुख्य आरोपी महेश गोस्वामी याने या चौघींना सनशाईन टॉवरच्या घरात बोलावले होते. आणि रात्री मोठमोठ्याने गाणी वाजवून आरोपींनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि रॉडने हल्ला केला होता.





