पुणे | निवृत्त मुख्याध्यापिकेची २ कोटींची फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवृत्त मुख्याधिपिकेच्या वृद्धत्त्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली, तसेच दोघांनी महिलेकडे १० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकारही समोर आला आहे.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी वकिलासह सहा जणांवर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ ते मार्च २०२४ या कालावधीत गुलटेकडी येथे घडला आहे.
याबाबत तारामती सदानंद पाठक (७५, रा. सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी मंगळवारी (दि. १८) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून ॅड. रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. ५, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे,
चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरुणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजीत (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची धायरी येथे १ हेक्टर ३३.६ आर एवढ्या आकाराची जमीन आहे. आरोपी रवी जाधव याने इतर आरोपींसोबत संगनमत करून फिर्यादी यांच्या वृद्धत्त्वाचा व आजारपणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची धायरी येथील जमिनीच्या किमतीची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली.
रेडी रेकनरच्या दरानुसार ही जमीन तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची असताना आरोपींनी केवळ एक कोटी रुपयांना विकण्यास भाग पाडले. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली.
याशिवाय रवी जाधव आणि अभिजीत या दोघांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महिलेला घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. फिर्यादी दोघांना भेटण्यासाठी गेल्या असता, त्यांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कोलंबीकर करत आहेत.




