1996 Bomb Blast: 1996 च्या बॉम्बस्फोटाबद्दल 4 जणांना आजन्म कारावास

नवी दिल्ली – दिल्लीतील लजपत नगरमध्ये 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील 4 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने आज आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. 21 मे 1996 रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये 13 जण ठार तर 38 जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 27 वर्षांनी या घटनेतील दोषींना न्याय मिळाला आहे.
या दोषींनी भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कटाची अंमलबजावणी केली होती, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये म्हटले आहे. जरी हे प्रकरण दुर्मिीळातील दुर्मिळ या श्रेणीतील असले तरी अंतिम निकालासाठी 27 वर्षांचा विलंब झाल्यामुळे या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य केली नाही.
या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पूर्वी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या दोघांना आजन्म कारावासाच्या शिक्षेसाठी आत्मसमर्पण करण्याचे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित असल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी 17 आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते.
या पैकी एकाचा मृत्यू झाला तर 7 जणांना फरार घोषित करण्यात आले. त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकला नाही. उर्वरित 9 जणांवर खटला चालवला गेला. त्यांना उच्च न्यायालयाकडून वेगवेगळ्या शिक्षा दिल्या गेल्या. सत्र न्यायालयाने तिघांना सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने आजन्म कारावासात बदलली होती. या शिक्षेला 4 जणांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.





