198 बालकांना पुन्हा मायेची ऊब; घर सोडून आलेली 137 मुले पालकांच्या स्वाधीन

पुणे – “मनासारखे केले नाही, पालकांशी भांडणे झाली याचा मनात राग धरून घर सोडून गेलेल्या 198 अल्पवयीन मुलांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी पालक, शासकीय सामाजिक संस्थांच्या स्वाधीन केले आहे. जानेवारी ते जुलै 2023 या काळात प्रामुख्याने पुणे, दौंड, नगर, कुर्डुवाडी, सोलापूर, मिरज रेल्वे स्थानकादरम्यान ही अल्पवयीन मुले आढळली आहेत.
पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी लोहमार्ग हद्दीतील विनापालक बालकांना शोध घेण्याबाबत रेल्वे पोलिसांना मार्गदर्शन केले आहे. लोहमार्ग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या अल्पवयीन बालकांचा शोध घेण्याची मोहीम राबवली. एकटे मूल आढळताच त्याला विश्वासात घेत आपुलकीची भावना निर्माण करून त्यांना त्यांच्या पालकाच्या स्वाधीन केले जाते. तर काही बालकांना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून शासकीय सामाजिक संस्थेच्या स्वाधीन केले जाते.
यातील 137 बालकांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 61 बालकांना शासकीय सामाजिक संस्थेच्या स्वाधीन केले आहे. रेल्वे स्थानकावरील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी रेल्वे प्रशासन, सामाजिक संस्थेसोबत समन्वय ठेऊन विशेष मोहीम राबवून विनापालक असणाऱ्या मुलांचा शोध घेण्यात आला.




