पुणे रेल्वेची १९१.५६ कोटींची कमाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे रेल्वे विभागाने जुलै महिन्याचे सर्व उद्दिष्टे साध्य केले आहे. या महिन्यात तब्बल १९१ कोटी ५६ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.३ टक्क्यांनी अधिक आहे. प्रवाशांचा महसूल १३९ कोटी ४ लाख असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी अधिक आहे. मूळ प्रवासी वाहतुकीतून ५ कोटी ५२ लाख रुपये उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते १६ टक्के जास्त आहे.
माल भाडे उत्पन्न ४० कोटी ७० लाख झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ते १६ टक्के अधिक आहे. इतर कोचिंगचे उत्पन्न १० कोटी ४२ लाख असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के अधिक आहे. विविध महसुलातून १ कोटी ४१ लाख रुपये, तर पार्सल सेवेतून ४ कोटी २५ लाख रुपये मिळाले आहेत.
जे गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्के अधिक आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे रेल्वेच्या उत्पन्नाचा आलेख वाढत आहे.





