नोकरीच्या आमिषाने 19 लाखांची फसवणूक

सातारा -सरकारी नोकरीचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून अनेक तरूणांची 19 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गणेश कृष्णा चव्हाण (रा.सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश नंदकुमार शिंदे (रा. बोरगाव, ता. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 7 जानेवारी 2021 ते दि. 31 मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयिताने फिर्यादीला दि. 7 जानेवारी 2021 रोजी संपर्क करून नोकरीबाबत विचारणा केली. त्यानंतर फिर्यादीला भेटून त्यांचा विश्वास संपादन करून वन,आरोग्य विभागात आपला वट असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने फियादीचे मित्र श्रीरंग निकम (रा. सदरबझार), सचिन दगडू कदम (रा. घाटकोपर, मुंबई), सागर संतोष उत्तेकर (रा.कांदिवली, मुंबई), किरण प्रकाश शिंदे (रा. गडकर आळी, सातारा) यांनाही वन, आरोग्य विभागात वट असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्यांच्याकडूनही वन विभागात वनरक्षक पदावर नोकरीला लावतो, असे सांगून रोख तसेच फोन पेद्वारे एकूण 19 लाख रूपये घेतले. त्यानंतर राजेशने पैसे घेतलेल्या तरूणांना वारंवार वेगवेगळी कारणे सांगून नियुक्ती मिळण्यास विलंब होत असल्याची थाप मारली. मात्र, वैतागलेल्या या तरूणांनी त्याच्यामागे पैशासाठी तगादा लावल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यामुळे राजेशने आपली फसवणूक केल्याचा संशय बळावल्यानंतर गणेश चव्हाणने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हवालदार बसवंत तपास करत आहेत.





