18 जणांची ‘करोना’तून सुटका

आणखी 57 बाधित सापडले; दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
पुणे – करोनामुळे मृत्यूचा कहर माजवणाऱ्या ससून रुग्णालयात गेल्या 24 तासांत एकही रुग्ण दगावला नाही. तर, यातही आणखी आनंदाची बाब म्हणजे ससूनसह अन्य रुग्णालयांतील 18 जणांची प्रकृती ठणठणीत झाल्यामुळे त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात नवीन 57 करोनाबाधित आढळून आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, शहरात नवीन बाधित रुग्णासह एकूण 411 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यातील 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 11 रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत असून, भारती हॉस्पिटलमध्ये 2 तर दीनानाथ आणि सिम्बॉयासिस रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 हजार 787 जणांची तपासणी केली असता, त्यामध्ये 3 हजार 207 जणांचे नमुने निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 511 जणांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असून, शहरातील (पुणे महापालिका आणि ससून रुग्णालय) बाधित रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने 52 जणांचा बळी घेतला आहे. त्यातील तब्बल 42 बळी हे एकट्या ससून रुग्णालयातील आहे. ससून रुग्णालयात मृत्यूची संख्या का वाढते, यावरून अनेक तर्क-वितर्क लावून राजकीय खेळीही खेळल्या गेल्या. त्यामध्ये तत्कालिन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली झाली. दरम्यान, गेल्या 24 तासांत ससून रुग्णालयासह शहर किंवा जिल्ह्यात एकही बळी गेल्याची नोंद झाली नाही. तर 18 जणांना घरी सोडण्यात आले.





