India-Pakistan : पाकच्या गोळीबारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू तर, ६० जण जखमी

India-Pakistan – भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तान सतत गोळीबार करत आहे. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेला लागून असलेल्या जम्मू क्षेत्रातील किमान पाच जिल्ह्यांमधून लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले जात आहे.
या गोळीबारात १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरी आणि मंत्री सतीश शर्मा यांच्यासह जम्मू, राजौरी आणि सांबा जिल्ह्यातील मदत छावण्यांना भेट दिली. त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला आणि विस्थापित कुटुंबांना आश्वासन दिले.
मंत्री सतीश शर्मा म्हणाले की, सीमेवरील राजौरी-पूंछ भागातून सुमारे आठ ते १० हजार रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना तेथे अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत.
उमर अब्दुल्ला यांनी मिश्रीवाला, नागबनी, बिश्नाह आणि थंडी खुई येथील मदत केंद्रांनाही भेट दिली व योग्य सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे असे त्यांनी सांगितले पाकिस्तानच्या आक्रमकतेचा निषेध करताना उमर अब्दुल्ला म्हणाले, भारताला आपल्या लोकांचे आणि भूभागाचे पूर्ण ताकदीने रक्षण करण्याचा अधिकार आहे.
यासोबतच, सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व लोकांना रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी लोकांना अफवा टाळण्याचा सल्लाही दिला.





