Cyclone Sitrang : सितरंग वादळामुळे बांगलादेशात 18 ठार

ढाका – सितरंग वादळामुळे बांगलादेशात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. (18 killed as cyclone Sitrang lashes Bangladesh) यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. वादळामुळे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज पहाटेच्या सुमारास सितरंग वादळ बांगलादेशच्या किनाऱ्यावर आले. त्यानंतर वादळाचा वेग मंदावला. सोमवारपासून वादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. कोमिला येथे एका घरावर झाड कोसळल्यामुळे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला. तर भोला जिल्ह्यात अंगावर झाड पडल्यामुळे आणि नदीच्या पूरात बुडाल्याने अन्य चौघांचा मृत्यू झाला.
नरैल आणि बारगुना या उपजिल्ह्यांच्या ठिकाणी प्रत्येकी एकाचा मृच्यू झाला. वादळात सापडलेली बोट बुडाल्याने एक महिला आणि तिच्या बालकाचा बुडून मृत्यू झाला. वादळामुळे बंगलादेशातील 10 हजार घरांचे नुकसान झाले आहे. कप 6 हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.





