पुणेकरांनो काळजी घ्या! फटाक्यांमुळे शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना

पुणे – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी झाली. मात्र, क्षणभराचा आनंद घेताना या आतषबाजीमुळे शहरातील 17 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. प्रामुख्याने आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमुळे इमारतीमधील गॅलरी, फ्लॅट, वाहने, झाडे, दुकान यांना आग लागल्या. औंध येथील घटनेत एक फ्लॅट जळून खाक झाला. अवघ्या पाच तासांत एकापाटोपाठ एक आगीच्या घटनांमुळे आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांची धांदल उडाली.
औंध, डीपी रोडरवरील टेरेजा सोसायटीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटला रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. ही इमारत 12 मजली असून, आग मोठी असून, इमरतीमध्ये नागरिक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच औंध, एरंडवणा, कसबा, कोथरूड आणि पीएमआरडीएचे बंब आणि एक टॅंकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बीए सेट परिधान करून सुरुवातील घरात कोणी अडकलेले नाही ना, याची खात्री झाल्यावर पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.
सर्वत्र धुर पसरल्यामुळे इमारतीमधील 35 ते 40 जणांना तत्काळ टेरेसेवर सुखरूप नेले. आगीत फ्लॅट जळून खाक झाला. ही आग फटाक्यांमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. यावेळी सहाय्यक विभागीय अधिकारी गांगड यांच्यासह 4 अधिकारी आणि तीस जवान घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी दिली.
दरम्यान, कात्रज, वारजे माळवाडी, गुरुवार पेठ, खडक, लोहगाव, बालेवाडी, तपकीर गल्ली या ठिकाणी घरातील गॅलरी, दुकाने आणि जुन्या वाड्याला आग लागली. तर बी. टी. कवडे रोड आणि भांडारकर इन्स्टीट्यूटजवळ दुचाकीला आग लागली. तर अन्य घटनेत झाड आणि कचऱ्याला आग लागल्याच्या घटना आहे.
फटाक्यांमुळे लागलेल्या आगी (सायंकाळी 7 ते रात्री 12 बाजेपर्यंतच्या घटना) ः जनता वसाहत, गल्ली क्रमांक 47 येथे झाडाला आग, कात्रज, आंबेगाव पठार, साईसिद्धी चौक येथे गॅलरी, बी. टी. कवडे रस्ता, बीटाटेल इनक्लेव्ह येथील सोसायटी, नऱ्हे, मानाजीनगर, ज्ञानदेव शाळेचा छत, विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटलजवळ, वारजे माळवाडी, चैतन्य चौक, युनिव्हर्सल सोसायटी, सिंहगड रस्ता, शारदा मठाजवळ, श्वेता सोसायटीत नारळाच्या झाडाला, गुरुवार पेठ, शितळादेवी चौक, जुना वाडा, लोहगाव, अंबानगरी, लटेरिया सोसायटी, वडगाव शेरी, टेम्पो चौक झाडाला आग, खडक पोलिस स्टेशन, लाकडी गणपतीजवळ गॅलरीत, औंध, डिपी रस्ता, इंडियन बॅंकेजवळ, टेरेजा सोसायटी, सिंहगड रस्ता, संतोष हॉलमागे नारळाच्या झाडाला आग, बालेवाडी, दत्तमंदिराजवळील दुकान, शनिवार पेठ, नाना नानी पार्क येथे कचऱ्याला आग, भांडारकर इन्स्टिट्यूट बुलेट गाडीला आग, बुधवार पेठ, तपकीर गल्लीतील दुकान.





