पुणे जिल्हा | एमआयटी विद्यापीठात 158 जणांचे रक्तदान

लोणी काळभोर (वार्ताहर) – एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल 158 दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला.
या रक्तदान शिबिराचे उद् घाटन विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर कुलसचिव डॉ. महेश चोपडे, सहायक कुलसचिव डॉ. विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, डॉ. श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. विशाल पाटील, प्रा. हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
दरम्यान विद्यापीठ आवारात प्रत्येकी 20 किलो अन्न कचर्यापासून 2500 लिटर बायोगॅस क्षमता असणार्या तीन युनिट्सचे उद् घाटन करण्यात आले. या कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून दररोज 5 तास शेगडी चालू शकेल इतका गॅस तयार होणार आहे.
ज्या माध्यमातून तब्बल 6 मेट्रीक टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. या माध्यमातून तयार होणार्या गॅसचा वापर विद्यापीठाच्या स्वयंपाकघरासाठी होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. चोपडे यांनी यावेळी दिली.





