अडिस अबाबा, (इथिओपिया) – इथिओपियातील दुर्गम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून यात किमान १५७ जण ठार झाले आहेत. याच ठिकाणी आदल्याच दिवशी देखील भूस्खलन झाले होते. तेथे मदत आणि बचावासाठी गेलेले लोक दुसऱ्या दिवशी झालेल्या भूस्खलनात गाडले गेले, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. इथिओपियाच्या दक्षिणेकडील केंचो शांचा गोझदी जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भूस्खलनात ५५ ठार झाले होते. मंगळवारी पुन्हा झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या वाञून १५७ झाली. चिखलाच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्यांमध्ये लहान मुले आणि गर्भवती महिला देखील आहेत. चिखलातून ५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही अनेक जण चिखलाखाली गाडले गेले आहे. डोंगरउतारावरील अनेक घरे देखील चिखलाखाली पूर्ण गाडली गेली आहेत. तेथील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे, असे आपत्ती प्रतिसाद दलाने म्हटले आहे. इथिओपियात पावसाळी काळात भूस्खलन होणे ही सामान्य घटना आहे. हा पाऊस जुलैमध्ये सुरू झाला आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत टिकेल अशी शक्यता आहे.