पुणे | राज्यात गतवर्षी १५,४३४ अपघाती मृत्यू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्यात २०२३ मध्ये १५,४३४ अपघाती मृत्यूंची नोंद झाली आहे. हे अपघात राज्यातील ११ पोलीस आयुक्तालये आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या कक्षेत घडले आहेत. मात्र, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघातांत थोडी घट नोंदवली गेली असली, तरी मृत्यूंची संख्या गंभीर दखल घेण्याजोगी आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) राज्यातील रस्ते अपघाताची जिल्हानिहाय नोंद असते. ते याची तुलना करून कारणमीमांसाही करतात.
सध्या त्यांच्याकडे २०२३ मधील अपघातांची नोंद पूर्ण झाली असून, २०२३ मध्ये १५,४३४, तर २०२२ मध्ये १५,७८४ अपघाती मृत्यू झाले. सन २०२३ मध्ये अपघाती मृत्यूंची आकडेवारी किंचित घटली आहे.
मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातात जीव गमवावा लागत असेल, तर ती गंभीर बाब आहे. राज्यात सर्वाधिक अपघात हे महामार्गावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये जड वाहने, तसेच बसने ठोकरल्याने पादचारी, तसेच दुचाकीस्वार किंवा कारचालकांचा मृत्यू झाल्याचे दिसते. शहरांलगत असलेल्या महामार्गावर पादचारी आणि दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.
बेकायदा पंक्चरमधून रस्ता ओलांडणे अनेकांच्या जीवावर बेतत आहेत. अनेक ठिकाणी महामार्गालगत अंतर्गत रस्ते नाहीत. त्यामुळे अनेकदा अचानक महामार्गावर दुचाकी येण्याचे घडते. महामार्गावरील अपघात हे रात्री आणि पहाटे जास्त घडतात.
चालकाच्या डोळ्यांवर अचानक झापड येणे, नियंत्रण सुटणे ही कारणे त्यामागे आहेत. महामार्गावर रस्ते ओलांडताना अपघातानंतर अनेकदा बळींची, तसेच वाहनचालकाचीही ओळख पटत नाही.
हरांतर्गत सीसीटीव्हींचे जाळे असल्याने तेथे वाहनचालकांना माग काढणे पोलिसांना सोपे जाते. जड वाहने अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या- तिसऱ्या राज्यात प्रवास करत असल्याने शोध घेणेही जिकिरीचे होऊन जाते.
महामार्गावर बंद पडलेली वाहने आणि लेनची शिस्त न पाळणे यामुळेही अपघात होतात, तसेच नादुरुस्त असलेली वाहने महामार्गावर आणल्यानेही अपघात होतात.
अपघातात नंबर एक पुणे जिल्हा
राज्यात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे पुणे जिल्ह्यात झाले आहेत. यामध्ये २०२३ मध्ये १०९३ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ अहमदनगर येथे ८८७, नाशिक ग्रामीणमध्ये ८४३, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५७८ मृत्यूंची नोंद आहे.
४०० पेक्षा जास्त मृत्यूंची नोंद ही यवतमाळ ४४६, कोल्हापूर ४३०, नागपूर ४०३ आणि जळगाव ४९२ मध्ये आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी राज्य महामार्ग पोलिसांची गस्त आणि विविध उपाययोजना वाढविण्यात आल्या आहेत. – प्रशांत बोरुडे (सीआयडी प्रमुख)





